तयारी ..

सौ फारशा आढे वेढे न घेता तयार झाल्या. घरात बाकीच्यांना पण सांगून टाकलं की मी या गणपती मध्ये घरी नसणार..! हा एका अर्थी बॉम्ब च होता कारण सणासुदीला अरण्यात बोंबलत फिरण्याची कन्सेप्ट आपल्याकडे नाही . आणि तो एकमेव वेळ असतो जेव्हा सगळे एकत्र असतात . त्यामुळे तशी नाराजी झालीच होती पण माझ्या हातात काहीच नव्हतं. माना पूल्स च बुकिंग 6 महिने आधी करावं लागतं तर आपल्याला हवं तसं मिळतं. पण इथं आम्ही जागे झालो 4 महिने आधी त्यामुळं कन्फर्म बुकिंग मिळण्यासाठी जंग जंग पछाडत होतो .माना पूल्स मध्ये रिसॉर्ट्स बरेच आहेत जिथे तुम्हाला 5 स्टार राहणीमान तिथे सुद्धा उपभोगता येतं . पण त्याचं बजेट कमीत कमी 8000$ इतकं आहे . आणि ते काही शक्य नव्हतं .आम्हाला हवं होता ते साधारण सगळं मिळून 1500ते 2000 $ .आमच्या टूर मध्ये आणखी एक मुख्य भाग असतो तो म्हणजे ग्रुप तयार होणे .जर या किमतीला टूर करायची असेल तर कमीत कमी 5 जण पाहिजेत. कौशिक आणि मी तर नक्की होतो, राहिले अजून 3 जण त्याआधी आमचा टूर प्लॅन नीट होणं गरजेचं होतं पण काही केल्या बजेट आटोक्यात येत नव्हतं. माना पूल्स ला भारतातुन खूपच कमी लोक गेले आहेत आणि जे गेले होते त्यांच्या माहितीनुसार किमान 4000 $ खर्च हा येणारच . काही केल्या मार्ग दिसत नव्हता . असा वाटायला लागलं की टूर काही होत नाही . पण हताश होऊन स्वस्थ बसणं मान्य नव्हतं. मी गुगल वरुन काही माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता त्या नादात बरेच इ मेल लिहिले होते. त्यातला एका इ मेल ला उत्तर आलं होतं.Dear sir if you are a group of 5 confirm people we can arrange accomodation in Govt tented sites with 100℅upfront payment but dates are confirm 1-6sept Anthony Mana pools आणि नेमका हेच कारण होतं मी सणासुदीला घरी नसणार होतो. अँथनी बॉन हा मूळचा साऊथ आफ्रिकेचा .साऊथ आफ्रिकेमधून स्थलांतर होऊन झिम्बाब्वे मध्ये स्थायिक झालेल्या गोऱ्या कुटुंबांपैकी एक . ज्यांनी झिम्बाब्वे च्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीला बराच हातभार लावला .अँथनी ची आई सेली बॉन या शिक्षिका होत्या . झिम्बाब्वे मधल्या राजकीय आणि आर्थिक अस्थिरते मुळे मागच्या काही वर्षात बराच वर्ण द्वेष माजला ,आणि त्या दरम्यान त्यांना काढून टाकल मागच्या 25-30 वर्षात जमा केलेल्या पुंजीवर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता . राजकीय अस्थिरतेमुळे आलेल्या आर्थिक संकटाला तोंड देता यावं म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घराला ” गेस्ट हाउस” किंवा होम स्टे मध्ये बदललं होतं आणि आपल्या कुटुंबाला परत साऊथ आफ्रिकेला पाठवून दिलं होतं. त्या स्वतः तिथल्या टूरिझम बोर्ड च्या माजी अध्यक्ष होत्या . वय वर्ष 78.पण विलक्षण आदरातिथ्य अत्यंत आदर पूर्वक वागणं आणि आपल्याला आयुष्यात किती कटू प्रसंगांना तोंड देत हे सगळं करावं लागतं आहे याचा लवलेश ही चेहऱयावर नाही . अँथनी बरोबर च सुत जुळायला कदाचित हेच कारणीभूत होतं.ही सगळी पार्श्वभूमी सांगणं यासाठी गरजेचं आहे की पुढे येणाऱ्या कित्येक दोलायमान प्रसंगांना या बॉन कुटुंबामुळेच तोंड देता आलं आणि संपूर्ण नवीन आणि अनोळखी प्रदेशात कोणतीही ओळख नसताना कसलाही पूर्व अनुभव नसताना केवळ माणुसकी च्या जोरावर आणि या कुटुंबाच्या नावाच्या प्रभावामुळे निभावून जातां आले.हे सगळं झालं त्याला भेटल्यानंतर चा अनुभव ,पण नुसत्या इ मेल वरून हे सगळं कळणं अशक्य होतं .

माझा अँथनी बरोबर संवाद सुरू झाला , कित्येक इ मेल आम्ही एकमेकांना लिहिले , माझ्या प्रत्येक बारीक सारीक शंकाना तो न कंटाळता उत्तर पाठवत होता. प्रश्न माझा एकट्याचा नव्हता आम्ही 5 जण असणार होतो त्या सगळ्यांना झेपेल, पटेल अशी तडजोड होणं गरजेचं होतं .गणपती च्या दिवसात जायला लागू नये यासाठी खूप प्रयत्न केले पण आम्हला जे बुकिंग मिळत होतं ते आधीच बुकिंग रद्द झाल्याने मिळणार होतं.माना पूल्स मध्ये विविध प्रकारे राहायला मिळतं १ तुम्ही तुमचे तंबू घेऊन जाऊन तिथं राहू शकता २ बांधीव कॅम्प असतात ज्या मध्ये राहण्याची सोय असते बाकी सगळे विधी कॉमन संडास बाथरूममध्ये उरकावे लागतात याला community campsite अस म्हणतात , हा प्रकार अतिशय स्वस्त असतो परंतु आरोग्यासाठी साठी आणि आमच्या बरोबर असणाऱ्या फोटोग्राफी साधनांसाठी धोक्याचं होतं ३ टेंटेड कॅम्प साईट हा प्रकार आम्हाला मानवणार होता आणि परवडणार होता . स्विस टेंट ची रचना असलेलं पण स्वयंपाकघर वेगळा असलेला प्रकार होता . त्यात प्रत्येक टेंट ज्यामध्ये 2 बेड्स आणि संडास बाथरूम असलेले होते . आणि अगदी झामबेझी नदीच्या बाजूलाच होतें हा आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता. फोटोग्राफी साठी मुबलक प्रमाणात संधी मिळू शकणार होत्या.त्यात मेख अशी होती की अशा फक्त 3 टेंटेड साईट्स होत्या आणि त्या पैकी दोन चें आधीचे बुकिंग रद्द होत असल्याने मिळत होत्या . मी वाटाघाटी करून दोन तंबूंचे बुकिंग तात्पुरते करून ठेवले, पुढच्या 10 दिवसात त्याचे पैसे आणि सफारी चे पैसे भरायचे होते. माना पूल्स मध्ये सफारी चे फारसे काही टेन्शन नसते , कारण सफारी या चालतच असतात फक्त आपल्याला रेंजर सोबत किंवा रेंजर शिवाय हा पर्याय असतो.शहाण्या माणसांनी रेंजर शिवाय पायी फिरण्याचा पर्याय घेऊ नये कारण शेजारी झाडापालिकडे उभ्या असलेल्या बिबट्याचा, सिंहाचा किंवा पाणघोड्याचा अंदाज आपण लावू शकत नाही.आणि तसा प्रसंग आमच्या वर आला होताच.ते येईलच यथावकाश पुढे .तात्पुरत्या बुकिंग मुळे एक गोष्ट नक्की झाली ती म्हणजे आपल्याला एकंदर खर्च किती येणार आणि आपला प्रवास कुठून कसा असणार हे नक्की कळलं होतं.यात एक गोष्ट मी गृहीत धरून चाललो होतो ती म्हणजे माना पूल्स ला आम्हाला अँथनी पोचवणार, पण वास्तवात काही वेगळच घडणार होतं.अँथनी चा दुसरा इ मेल येऊन धडकला , ज्यात त्यानी” सेल्फ ड्राईव्ह ” चे पर्याय आणि त्याचा खर्च दिला होता. हे प्रकरण जरा भलतीकडेच झुकतय असं वाटू लागलं होतं. परदेशामध्ये स्वतः गाडी चालवत पर्यटन करण्याची मानसिकता आहे हे माहीत होतं पण इथं आपल्याकडे घरच्या दारापासून पिक उप ड्रॉप ची वाईट सवय असल्याने ,थोडा पचायला जड होतं. यात मिळणारा अनुभव मात्र खूप काही शिकवून जाणार होता.एव्हाना हे कळून चुकलं होतं की माना पूल्स हे दिसतंय तेवढा सरळ प्रकरण नाहीये ,बराच खटाटोप करावा लागणार आहे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपण तिथे असणार आहोत, पण म्हणतात ना जित्याची खोड xxxx आता एवढा सगळं पुढाकार घेऊन केल्याने मी टूर लीडर झालो . माझ्या पुढे मोठा प्रश्न होता तो म्हणजे ऐन सणासुदीच्या दिवसात आमच्या दोघांशिवाय अजून तिघे कोण बरं येतील.? कारण या प्रकारच्या साहसी फोटोग्राफी साठी आणि अनुभवा साठी डोक्याने कमी आणि हृदयाने विचार करणारी वेडी माणसं लागतात.कौशिक नि दोघे जण सुचवले त्यातला एक म्हणजे सलील नायर ( ठार वेडा… एकदा पटलं की मग मागे पुढे न बघणारा) दुसरा डी व्ही राजप्रसाद श्रीलंकन पासपोर्ट पट्टीचा बिझनेसमन पैशा कडे न बघणारा फोटोग्राफी ची बऱ्या पैकी जाण असलेला आणि फिरण्याची दांडगी हौस असलेला येडा हे दोघे ही एकमेकांचे मित्र असल्याने त्यांना तयार व्हायला फार वेळ लागला नाही.पाचवा पार्टनर म्हणून मी मधू ला विचारलं.मधुसूदन श्रीनिवासन बंगलोर चा राहणारा ,सॉफ्टवेअर फर्म मध्ये कामाला होता . मधू बरोबर मी याआधी बिकानेर, ताल छापर, केनिया अशा टूर केल्या होत्या त्यामुळे आम्हाला एक मेकांच्या स्वभावाचं , फोटोग्राफी च्या पद्धतीचं आकलन होतं आणि त्यामुळे आमचं ट्युनिंग बऱ्यापैकी जमतं.मधू ला हा प्लॅन सांगितल्यावर त्याने सुध्दा फार आढे वेढे न घेता हो म्हणलं. फक्त त्याची एकच अट होती ती म्हणजे त्याला पैसे लगेच देणं शक्य नव्हतं , तो प्रवासाला निघणार त्या दिवशी देईन म्हणला . आता अडला हरी मधू चे पाय धरी अशी अवस्था असल्याने मी ठीक आहे म्हणलो पण एक अट घातली ती म्हणजे त्याने विमान प्रवासाचे तिकीट लगेच काढून घायचे जेणे करून त्याचा विचार बदलणार नाही . या मध्ये अजून एक गोष्ट होती ती म्हणजे सगळं प्लॅनिंग 5 जण येणार या दृष्टीने केलं होतं , एक जण जरी यातून बाहेर पडला तर सगळं आर्थिक गणित बिघडणार होतं.अशा रीतीने मी , कौशिक, सलील ,मधु, आणि राजप्रसाद असे पाच जण मोहिमेसाठी सज्ज होत होतो.

लवकरच आम्ही मुंबई – नैरोबी- हरारे हे जाताना च आणि हरारे – नैरोबी-मुंबई असं येतानाच विमानाचं तिकीट बुक केलं आणि अँथनी ला माना पूल्स चे बुकिंग करण्यासाठी ऍडव्हान्स पाठवून दिला.माझ्या मनात कायम एक धाकधूक असायची की , आपण हे सगळं करतोय खरं, आपले पैसे बुडाले, बुकिंग ऐनवेळी नाही म्हणून सांगितलं तर काय करणार , सगळेच अनोळखी,
याला भरीस भर म्हणून मी पैसे पाठवल्यानंतर 8-10 दिवस झाले तरी अँथनी चा कुठलाच प्रतिसाद येईना. जो माणूस दिवसातून 2-3 वेळा इ मेल ला प्रतिसाद द्यायचा, व्हाट्स अप वर बोलायचा तो एकदमच “आऊट ऑफ रिच” झाला. मला तसं दडपण यायला लागलं, वाटलं मी काहीतरी भलताच घोळ घालून बसलोय . इकडे या चौघांची जोरदार तयारी चालू होती ,पण त्यांना याचा काही मागमूस लागू दिला नव्हता.बरोबर 15 दिवसानंतर अँथनी चा इ मेल आला आणि त्यात झिम पार्क चे बुकिंग वोउचर होते सोबत सर्व पैशांच्या पावत्या पण जोडल्या होत्या . माझा जीव भांड्यात पडला . त्याला विचारल्यावर कळलं की झिम्बाब्वे मध्ये बरीच उलथापालथ सुरू झाली आहे , मोर्चे, जाळपोळ वगैरे ,कारण तिथल्या सरकार ने अमेरिकन डॉलर ही करन्सी रद्द केली होती आणि सरकारी बॉण्ड्स काढले होते ,त्यामुळे सगळे व्यवहार रद्द झाले होते . थोडक्यात म्हणजे आमच्या पुढे बरेच प्रश्न आ वासून उभे राहणार होते .त्यातले माना पूल्स मधल्या अडचणींचा निबंध अँथनी ने पाठवला होता , त्यात मुख्य म्हणजे तुमची काय काय गैरसोय होणार होती ते सांगितलं होतं बदलत्या राजकीय परिस्थिती मुळे सरकारी ताब्यात असलेल्या कॅम्प ची दुरवस्था झाली होती .आम्हाला अशी माहिती मिळाली होती की तिथे वीज नसते , सगळं सोलर वर चालत, जे आमच्या साठी ठीक होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला कॅमेरा बॅटरी चार्ज करण्यासाठी लाईट असणे अत्यंत गरजेचे होतें. पण अँथनी च्या अपडेट नुसार तिथे सध्या सोलर पॉवर सुद्धा नाहीये आणि ती मिळण्याची शक्यता पण नाही.तिथे गॅस शेगडी उपलब्ध आहे पण तिथे तुम्हाला तुमचे जेवण स्वतः बनवावे लागणार , सफाई साठी दोन लोक असतील ते सफाई करून जातील ,ते पण दिवसातून एकदा .तिथे फळं घेऊन जाऊ शकत नाही ,कारण फळांचं वास हत्तींना7-८ किलोमीटवर सुद्धा येऊ शकतो आणि त्या नादात हत्ती टेंट पूर्ण उखडून टाकू शकतात. ( असे प्रसंग तिथे या आधी झाले आहेत).

तिथे फक्त टिन फूड घेऊन जाणे शक्य आहे आणि ते सुद्धा कोणताही कचरा तिथे न टाकता परत पार्क च्या बाहेर आणणे गरजेचे आहे .( take in take out policy) टेंट उघडे टाकून तुम्ही जाऊ नये कारण बबून( रानटी माकडाची जात ) येऊन तुमचं सगळे साहित्य अस्ताव्यस्त करून नुकसान करू शकतात. या सारख्या अनेक सूचनांची यादी त्यात होती .त्यामुळे हे नक्की झाला होतं की आपण खऱ्या अर्थाने रानटी अवस्थे मध्ये जगणार आहोत.आमचा प्लॅन तयार होत होता सगळे मुंबई मध्ये जमणार आणि तिथून एकत्र हरारे ला पोचणार ,हरारे मध्ये अँथनी आम्हाला गेस्ट होऊस वर नेणार आणि दुसरया दिवशी आम्ही माना पूल्स ला जाणार पजेरो घेऊन सेल्फ ड्राईव्ह करत.हरारे ते माना पूल्स हेब7-८ तासच अंतर आहें त्यात जवळजवळ 2 तास हा पूर्ण कच्चा रस्ता आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट नावाचा प्रकार तिथे नाही ज्याने आपण माना पूल्स ला जाऊ शकतो , एक तर तुमची स्वतःची4×4 गाडी हवी किंवा तुम्ही भाडयाने घेऊन सेल्फ ड्राईव्ह करू शकता.आम्ही अँथनी च्या मदतीने पजेरो बुक केली होती. मधू आणि कौशिक कडे IDP ( international driving permit ) होता त्यामुळे साहजिकच ते दोघे गाडी चालवणार होते आणि मी वाटाड्याचे काम करणार होतो, सलील आणि राज हे गाडीचा डागडुजी, पेट्रोल याची खबरदारी घेणार होते .या सगळ्या अडचणी लक्षात घेत आणि त्यानुसार गोष्टींची पूर्तता करत अखेर प्रवासाचा दिवस उजाडला .30 ऑगस्ट सकाळपासूनच काहीतरी विचित्र वाटत होतं अस्वस्थ होत होतं, सगळ्यांना फोन झाले सगळे आपल्या आपल्या मार्गाने मुंबई ला पोचत होते ,कौशिक आमच्या आधी दुसऱ्या विमानाने(एथिटोपीआन एरलाईन्स) आदिसबाब मार्गे हरारे ला पोचणार होता , माना पूल्स ला घेऊन जायच्या काही गोष्टी तिथेच घ्याव्या लागणार होत्या ती खरेदी आधी करून आम्ही नंतर त्यासाठी द्यावा लागणार वेळ वाचवणार होतो.आमचे नैरोबी साठी ( केनिया एअरवेज) चे विमान दुपारी 4 ला होते त्यानुसार मी आदल्या दिवशी सह्याद्री एक्सप्रेस नि निघालो.. 12 वाजत मुंबई ला पोचणारी सह्याद्री दीड तास तास लेट झाली आणि मी 1.30 ला पोचलो तेथून 45 मिन एअरपोर्ट ला पोचायला लागली . कसाबसा सव्वा दोन पर्येंत पोचलो अगदी कट्टा कट्टी . मधू , सलील आणि राज वाट बघतच होते , सगळ्या आवश्यक गोष्टी पार पाडून आम्ही विमानाची वाट बघत बसलो.माझा अस्वस्थपणा काही कमी होत नव्हता काहीतरी गडबड आहे असा सारख वाटत होतं . कदाचित ती पुढं घडणाऱ्या अनाकलनीय घटनेची नांदीच होती..

क्रमशः
डॉ अद्वैत आफळें