चिर्प चिर्प चिर्प … सन बर्ड पक्षाच्या बोलण्याने झोप चाळवली.
गादीवर तसाच पडून कालच्या घटनांचा डोक्यात चालू असलेला क्रम बंद केला . त्याच त्या विचारात राहून उपयोग नव्हता . जे झालं ते झालं, आता पुढचं नीट पार पाडू या विचाराने उठलो आणि सकाळची सगळी क्रिया कर्मे पार पाडली.हे गेस्ट हाउस आणि त्याचा परिसर इतका सुंदर होता की त्यानेच जास्त मानला उभारी मिळाली. रूम च्या बाहेर येऊन बघितला तर दोघे पार्टनर डाराडूर झोपले होते. चहा वगैरे काही मिळेल का या आशेने बाहेर आलो आणि कोस्टा ला हाक मारून विचारलं .. can i get some tea? कोस्टा म्हणाला sure sir .. please help yourself with it . Everything that you need is dumped in kitchen. आता खऱ्या अर्थाने झोप गेली. इथून पुढे जेवण सोडलं तर सगळं सेल्फ सर्विस सेल्फ कूक असणार आहे याची खूणगाठ मनात बांधली गेली . आफ्रिकन देशांमध्ये चहा उत्तम मिळतो. त्याचा अनुभव मी आधी केनिया मध्ये पण घेतला होता. डीप डिप चा चहा केला आणि बाहेर येऊन बसलो. तेवढ्यात मधू , सलील पण आले आणि त्यांनी पण चहा घेतला . आता सगळ्यात महत्त्वाचं होता ते म्हणजे माना पूल्स मध्ये घेऊन जायच्या वस्तू खरेदी. अँथनी ने आधीच यादी तयार ठेवली होती . त्यात सगळ्यात महत्वाचे होता ते म्हणजे टिन फूड . कोणतीही ताजी भाजी, फळे न्यायला मज्जाव होता . त्यामुळे भारतातून आणलेल्या रेडी टू इट वर भर होता . यादी पैकी बहुतेक गोष्टी आम्ही बरोबर घेऊन आलो होतो. पण वाटेत नाश्ता करायला थांबायला लागू नये यासाठी काही ब्रेड जॅम , केक, वगैरे पदार्थ घ्यायचं ठरलं. कोस्टा नि सल्ला दिला की शक्यतो बाहेर कुठंही थांबू नका, कोणत्याही हॉटेल मध्ये लंच वगैरे करायचा टाळा. त्याच कारण असा होता की आम्ही ज्यावेळी झिम्बाब्वे मध्ये होतो तेव्हा स्थानीय सरकार विरोधात बरीच आंदोलनं चालू होती आणि त्यात मोर्चे, जाळपोळ आशा घटना घडत होत्या. त्याचा आम्ही अपडेट कायम घेत होतोच. आम्हाला फक्त पेट्रोल साठी थांबण्याची परवानगी होती. त्याची सुद्धा व्यवस्था आधी करून ठेवावी लागणार होती.आमची ठरवलेली गाडी 11,30 वाजता आमच्या ताब्यात मिळाली. टाकुडझुवा ज्याच्याशी मी मागचे दोन महिने नुसतंच व्हाट्स अप वर बोलून सगळं नक्की करत होतो तो एकदाचा भेटला. ऑटोमॅटिक मितसुबिशी पजेरो , सर्व व्यवस्था एकदम चोख केली होती त्याने. वाटेत काही अडचण आली तर करायचे सगळे उपाय , जादाचे पेट्रोल टॅंक, 40 लिटर , गाडी ची टाकी फुल्ल करून दिली होती. सगळ्यात आधी त्याने मधू ला टेस्ट ड्राईव्ह घ्यायला सांगितली , त्या गाडीच्या काही गोष्टी समजून सांगितल्या, आमच्या पैकी कोणीच 4×4 गाडी चालवली नसल्याने हा अभ्यास महत्वाचा होता. मी टाकुडाझुवा ला म्हणल आम्हाला काही मदत लागली तर कुणाला मागायची. त्यावर तो म्हणाला गॉड कॅन हेल्प यु . त्याचा सांगण्याचा अर्थ असा होता की एकदा तुम्ही माना पूल्स च्या रस्त्याला लागलात की वाटेत कोणीही तुम्हाला कोणिही भेटणार नाही ..50 km मागे आणि 50 km पुढे असा पूर्ण निर्जन रास्ता आहे .

गाडीचा ताबा आम्ही घेतला , पेट्रोल ची जुळवाजुळव होणं गरजेचं होतं.एकदा तुम्ही आत शिरला की पेट्रोल कुठेही मिळत नाही. शेवटचा पेट्रोल पंप कारीबा या गावात होता. तिथे “इकॉनॉमिक क्रायसिस” चालू असल्याने व्हिसा कार्ड किंवा डॉलर मध्ये व्यवहार होईल असा पंप हवा होता. कोस्टा नि कारीबा मधल्या पेट्रोल पंप मालकांचा फोन लावून दिला आणि आमची बातचीत घडवून आणली. आम्ही साधारण किती वाजता पोचू याचा अंदाज त्याला दिला .आम्ही भारतीय आहोत आणि मी डॉक्टर आहे याच त्याला बरंच कुतूहल वाटलं असावं. आता पर्यन्त च्या अनुभवात आपण भारतीय आहोत असं संगीतल्यार लोक अदबीने आणि उत्सुकतेने बोलत आहेत असा अंदाज आला होता. आम्हाला भारत झिम्बाब्वे वन डे क्रिकेट शिवाय झिम्बाब्वे ची ओळख नव्हती . अँडी फ्लॉवर , ग्रांट फ्लॉवर या शिवाय दुसरी नावे माहीत नव्हती. या लोकांना सुद्धा आपल्या क्रिकेट आणि संस्कृती बद्दल प्रचंड उत्सुकता होती, हे मला माना पूल्स मधे जास्त जाणवलं.तर आमचा पेट्रोल चा, गाडीचा, प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला होता. आता राहिला होतं कौशिक आणि माना पूल्स मधल्या जेवणाची तजवीज.कौशिक यावेळी नक्की विमानात बसला होता आणि साधारण दुपारी 3 ला तो पोचला. तो आल्यावर त्याच यथेच्छ स्वागत “संस्कृत शब्दांनी “करण्यात आलं . सर लंच इज रेडी, असा सांगत कोस्टा आला, जाम भूक लागली होती ,आता जेवणावर ताव मारू असं म्हणत टेबल वर येऊन बघतोय तर जेवायला 3 फ्लॉवर चे तुकडे, 5 बटाट्याचे काप, चवळी सारखं असलेले बीन , हे जेवण आहे का सॅलड असा प्रश्न मी कोस्टा ला विचारला, त्याला माझ्या विचारण्याचा रोख कळलं असावा त्याने लगेच सांगितलं sir we will serve rice too..! पण जेवणाला नावे ठेऊ नये अशी आपली संस्कृती असल्याने जे होते ते अन्न दाता सुखी भव म्हणत गट्टम करून टाकलं. चौकडी जमल्याने वेळ पटपट जात होता, कौशिक च्या सुरस आदिसबाब च्या कथा ऐकत आणखीनच लवकर गेला . आमच्या यादी प्रमाणे आता थोडी खरेदी करायला म्हणून कोस्टा ला आमचा वाटाड्या करत जवळच असलेल्या मॉल मध्ये गेलो. पाण्याच्या बाटल्या, कॅन, कोल्ड ड्रिंक्स, तयार रोटी, तांदूळ, काही मसाले, आणि आमच्या 7 तासाच्या प्रवासात खायला केक, ,वेफर्स, चॉकलेट घेतली. जेव्हा आम्ही फोटोग्राफी साठी तासनतास भटकत असतो तेव्हा जेवण्याची फारशी शुद्ध कोणाला नसते तेव्हा हे असल्या सटरफटर खाण्याच्या गोष्टी कामाला येतात.पार्किंग मधून गाडी बाहेर काढत असताना एक बाब लक्षात आली ती म्हणजे पार्किंग मध्ये बऱ्याच गाड्या या मर्सिडीज, लॅंड रोवर, हमर, ऑडी या सारख्या उच्च भ्रू गाड्या होत्या. मी कुतूहलाने कोस्टा ला याबाबत विचारलं तेव्हा तो म्हणाला या सगळ्या गाड्या या जुना बाजारातून विकत घेतल्या जातात, शौक म्हणून, आम्ही सुद्धा गोऱ्या लोकांसारखे मिरवू शकतो हे दाखवण्यासाठी. इथं मुलांना शिक्षणाची फारशी आवड नाही, त्यांना एक मोठा डॉल्बी आणून द्या ते सदैव त्यातच दिसतील. सध्याची पिढी यामुळेच खराब होते आहे.थोड्या फार फरकाने काही न करता चंगळवादाची संस्कृती इथं बरीच भिनलेली दिसली. कोस्टा पुढे जाऊन असाही म्हणाला या लोकांसापासून तुम्हाला सावध राहायचं आहे .. हे लोक रस्त्यावर रेसिंग करून आपल्याला भरीस पडतात आणि वाद घालून लुटायचा कार्यक्रम करतात. हे ऐकून आम्ही जरा गांगरलोच होतो.रात्रीच्या जेवणात पुन्हा तेच भात आणि बीन्स, हे बघून आम्ही आमच्या बरोबर आणलेली सूप ची पाकीट उघडून त्यातल्या त्यात जेवणाला चव आणली.मी वाट्याड्या असल्यानं मी केलेला अभ्यास आणि त्या प्रमाणे असलेला प्लॅन सांगितला.आपल्याला शहरांमधून लवकर बाहेर पडायला लागेल, पहाटे 4.00चा गजर लावू , काही ऑम्लेट तयार करून घेऊ आणि 5.00 ला बाहेर पडू. एवढ्या लवकर का निघायचं, सलील नि विचारलं.सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रस्त्यावर दंगे होण्याचे काही शक्यता नाही ,त्यामुळे आपण सुखरुप बाहेर पडू, दुसरा आणि महत्वाचं कारण म्हणजे आपल्याला मारांगोरा गेट वर दुपारी 3 च्या आधी चेक इन करून तिथून माना पूल्स चे परमिट घ्यायचे आहे, तिथे पोचे परियन्त आपल्याला4 तास लागतात, तिथून पुढे 3 तास माना पूल्स . आपल्याला रस्ते नवीन आहेत, ट्राफिक किती असेल याचा अंदाज नाही, पेट्रोल पंप वर किती गर्दी असेल माहीत नाही, या सगळ्या शक्यता लक्षात घेता आपल्याकडे 2/3 तास हातचे असावे . आणि आपल्याला सनसेट च्या आधी तिथे पोचायचे आहे जेणे करून एक संध्याकाळ तरी पदरात पडेल. सगळ्यांना हा विचार पटला आणि आम्ही ठरल्या प्रमाणे 2 तारखेला पहाटे हरारे सोडलं.आम्ही बांकेत, चिनहू, कारीबा , मारांगोरा करत माना पूल्स ला पोचणार होतो. जसा दिवस उजाडला तसा आजूबाजूचं सौन्दर्य दिसायला लागलं. सूर्योदय होऊन सोनेरी किरणं गवताच्या कुरणांवर पडून मोहक पोपटी, सोनेरी रंगात रंगलेली होती. रस्ता सरळसोट होता त्यामुळे चुकायचा काही प्रश्न नव्हता . आपल्या सारखे तिथेही टोल नाके होते. आम्ही चुकीचा लेन मध्ये घुसलो त्यामुळे तिथल्या लोकांनी अडवलं, आणि मग ड्राइविंग लायसेन्स वैगेरे तपासून , गाडी तपासून पुढे जाऊ दिला. आपण उगाच शहाणपण दाखवलं नाही तर मुद्दाम कोणी त्रास देत नाही असा एकंदर आता पर्यंत चा अनुभव होता तो कामी आला, आणि डॉक्टर असल्याचा उपयोग उगाच भाव खाण्यात झाला.

हा रस्ता पुढे तसाच दक्षिण आफ्रिकेला जाऊन मिळतो त्यामुळे तो राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचा आहे, या भागात अवजड वाहतूक खूप चालते त्यामुळे भरधाव येणाऱ्या ट्रक पासून जरा जपूनच राहावे लागते. शहरात ताशी40 आणि महामार्गावर कधी ताशी80 कधी 100 असं करत आम्ही बांकेत, चिनहू मागे टाकलं. आता आम्हाला कारीबा ला पेट्रोल भरून घेणं गरजेचं होतं . कारीबा हे या भागातला माना ला पोचेपर्यंत च शेवटचं मोठं खेडं. या नंतर आमचा या जगबरोबर चा संपर्क तुटणार होता.आम्ही त्या पेट्रोल पंप च्या मालकाला भेटलो, तो जणू वाटच बघत होता . आम्ही गाडी फुल्ल करून घेतली, विशेष म्हणजे पेट्रोल पंप वर मुलीच कामाला होत्या. आम्ही डॉलर मध्ये पैसे देणार म्हणल्यावर मालक स्वतः आला . जोर्गी त्याच नाव. सैन्या मधून रिटायर झालेला आणि भारताबद्दल विशेष प्रेम असलेला . नुकताच आपण सर्जिकल स्ट्राइक केला होता आणि ते त्याला भयंकर आवडला होता. I use to like india but after your modi did the surgical strike , now i love india . Your leader should protect your citizens , and help them to prosper .त्याच्या अशा बोलण्याने आमचा उर अजूनच भरून आला . आणि या गोष्टीचा आश्चर्य ही वाटलं की इतर देशांमधले लोक किती जवळून या गोष्टी कडे पाहत असतात आणि त्यांचा दृष्टीकोन कसा असतो, नाहीतर कोण कुठला जोर्गी त्याला काय पडलाय भारताच्या राजकीय घडामोडींची. त्याच्या बरोबर च्या गप्पा संपवून आम्ही पुढे निघालो, त्याआधी त्याने आहाला आवर्जून सांगितलं की आत गेल्यावर कशाचीही गरज लागली तर मला संपर्क करा जोर्गी तुम्हाला मदत पोचवेल.अशी लोकं भेटल्यावर आपण पेपर मध्ये वाचत असलेल्या सर्व नकारार्थी बातम्या बाजूला पडतात. आणि माणुसकी हा समान धागा असलेली माणसं आपल्याला कुठेही उपयोगी पडतात.पुढच्या अर्ध्या तासात आम्ही आमच्या पहिल्या गेट वर पोचलो.मारांगोरा गेट.. इथून सुरू होते माना पूल्स ची हद्द.आमचे आधी केलेले बुकिंग , त्या नुसार आंम्हाला परमिट देण्यात आलं. आमची गाडी चेक करण्यात आली . आम्ही आत काही फळे किंवा भाजीपाला मांस घेऊन जात आहोत का याची खात्री केली गेली. जो काही कचरा तिथे तयार होईल तो सगळा बाहेर आणायचा आणि या ठिकाणी जमा करायचा , वाटेत कुठेही टाकायचं नाहीं. याच महत्वाचं कारण होता ते म्हणजे आम्ही जिथे जात होतो ते पूर्ण रॉ अरण्य होतं. तिथं एक चूक तुमच्या जीवावर बेतू शकते आणि अशा घटना तिथे घडल्या होत्या. आम्ही जायच्या आधीच घडल्या होत्या. पुढे ओघाने ते येईलच. आमची फोटोग्राफी ची सगळी तयारी बघून तिथल्या रेंजर नि आम्हाला बरंच चांगलं मार्गदर्शन केलं आणि वाइल्ड डॉग वर लक्ष केंद्रित करा असा सल्ला दिला. वाईल्ड डॉग ही एक काळाच्या ओघात लुप्त होत असलेली प्रजाती असल्याने तिथे त्यावर बरंच संशोधन सुरू आहे.आम्ही एकंदर तिथं कशी फोटोग्राफी केली जाते आणि आम्हाला काय अपेक्षित आहे ते सांगितलं. आमच्या मागणी नुसार त्यांनी असा आश्वसन दिला की तिथे तुम्हला जाणकार रेंजर गाईड म्हणून देऊ. हे म्हणजे आमच्या साठी खूपच मोठी गोष्ट ठरणार होती.आता आम्ही घाट उतरून राष्ट्रीय महामार्ग डाव्या बाजूला ठेऊन उजव्या हाताला वळलो, 100 मीटर लाच आम्हाला अजून एक चेक पोस्ट लागली “चिमुटसी” गेट . इथें आमचे परमिट चेक केले गेले, पुन्हा त्याच सगळ्या सूचना देण्यात आल्या आणि “त्से त्से” या रानटी माशी पासून सावधान करण्यात आलं. ही माशी कडकडून चावते आणि याने अंगावर राशेस ( allergy) येतात, डोकं दुखतं, ताप येऊ शकतो आणि समूहांनी यांनी जर हल्ला केला तर माणुस जीवानिशी जातो. हे ऐकत असतानाच एक माशी येऊन हातावर बसली, त्या रेंजर ने पटकन ती हाताने मारून टाकली.. you should kill tse tse fly ..dont allow it to bite you. अस म्हणत त्याने गेट उघडलं.

आता इथून पुढचा प्रवास हा पूर्ण निर्जन , आणि कच्चा रास्ता होता. टाकुडाझुवा च्या सांगण्यानुसार आता गाडी च्या चकामधली हवा कमी करायची वेळ आली होती, त्यानुसार , रेताड आणि मातीवर गाडी चालवायची असल्याने टायर ची पकड नीट राहावी यासाठी हे आवश्यक असतं. हवेचा दाब योग्य तेवढा कमी करून आम्ही पुढे निघालो. आमच्या बरोबर अति भव्य अस बाओबाब चे वृक्ष पळत होते , अगदी सरळसोट रास्ता. म्हणजे किमान 10 मैल वर आपण सहज बघू शकत होतो. असा रास्ता मुद्दाम केला जातो. वन्य प्राणी विशेष करून हत्ती जर या रस्त्यावर येत असतील तर ते लांबूनच दिसावं आणि त्याचा पासून आपला बचाव व्हावा. तिथे थोडे थोडके नाही तर तब्बल 12000 हत्ती आहेत.. आणि पूर्ण पणे रानटी.साधारण 40 किलोमीटर नंतर रुकोमेशी नदी पार केल्यावर आम्हाला आमचा दुसरं गेट लागलं “न्याकसिकांना” . या गेट वर आम्ही वेळेवर पोचलो . तिथ लेडी रेंजर होती, लटविन तीच नाव, अतिशय आदरपूर्वक आमची विचारपुस करून आम्हाला पुढचा रास्ता आणि तिथे कोणाला भेटायचे ते सांगितले. आम्ही आमचा एक फोटो घेताना तिच्या बरोबर पण एक फ़ोटो घेतला. या इतक्या सध्या गोष्टीचं एवढं कौतुक वाटलं तिला की तीने तीच स्वतः चा नंबर मला दिला आणि माझा तिने घेतला. If you need anything inside just. call Latwin renger. आमची एकच अपेक्षा होती, आम्हाला गाईड चांगला मिळू दे आणि तेच तिला पण सांगितलं. तिचा आज सुद्धा खुशाली विचारायला मेसेज येतो. एकंदर मला असा जाणवायला लागला होता की या लोकांना सहृदयी लोक भेटली किंवा आदराने वागणारी लोक भेटली की हे लोक आपणहून चार पावले पुढे येऊन मदत करतात.दुसऱ्या गेट नंतर सुमारे 1 तास धुळीमध्ये प्रवास करत आम्ही अखेर 3 च्या सुमारास माना पूल्स ला पोचलो. तिथे पोचत असतानाच आमच स्वागत भल्या मोठ्या हत्तीने वाट अडवून केलं. आम्ही सगळेच एकदम म्हणालो… अब आयेगा मजा..आम्ही थोडा वेळ तिथच थांबून हत्तीने वाट करून दिल्यावर मग पुढे मेन कॅम्प ला पोचलो.तिथली सगळी पूर्तता करून आमच्या ग्वाया कॅम्प मध्ये आलो. आणि टेंट मध्ये समान टाकून आमचे कॅमेरे सज्ज केले…

क्रमशः